साजवार्ता
Page No.: 3 Date: 17/11/2026
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): भावसिंगपुरा
येथील शाक्यनगर परिसरातील सर्वे क्रमांक ३२/२ मधील १५ मीटर रुंदीच्या प्रस्तावित रस्त्याच्या जागेतील आठ बांधकामे सोमवारी (दि. १६) जमीनदोस्त करण्यात आली. महापालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली.
शहरातील रस्ते रुंदीकरण आणि विकास आराखड्यातील रस्त्यांसाठी आवश्यक जागा मोकळी करण्याच्या दृष्टीने
महापालिकेकडून अतिक्रमणांवर कारवाई केली जात आहे. शाक्यनगर, भावसिंगपुरा येथील सर्वे क्रमांक ३२/२ मध्ये १५ मीटर रुंदीचा रस्ता प्रस्तावित आहे. या रस्त्याच्या जागेत आठ बांधकामे आढळून आली होती. संबंधित बांधकामधारकांना महापालिकेने यापूर्वीच नोटिसा बजावल्या होत्या. त्यानंतर सोमवारी कारवाई करण्यात आली. महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाचे संनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही
मोहीम राबविली. यावेळी उपायुक्त सविता सोनवणे, सहाय्यक आयुक्त लता पुजारी, संजय सुरडकर, इमारत निरीक्षक सुंदर खरात, रवींद्र देसाई, शंकर दोडके यांच्यासह नागरी मित्रपथक आणि अतिक्रमण हटाव पथकातील कर्मचारी उपस्थित होते. महापालिकेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे या कारवाईची माहिती दिली. प्रस्तावित रस्त्याच्या जागेतील बांधकामे हटविल्याने भविष्यातील रस्ता विकासासाठी जागा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions













